दहावीच्या विद्यार्थ्याने तयार केले क्वारंटाइनमधील नागरिकांसाठी संकेतस्थळ, देशविदेशातील नागरिकांना एकांतवासात दिलासा

वर्धा - कोरोनामुळे विलगीकरणात बंदिस्त झालेल्या नागरिकांसाठी शालेय विद्यार्थ्याने तयार केलेली एक वेबसाईट देशविदेशातील नागरिकांना एकांतवासातही दिलासा देत आहे. विदेशातून किंवा परप्रांतातून आलेल्या नागरिकांना विलगीकरणात राहणे अनिवार्य करण्यात आले आहे. हा दीर्घ कालावधी अनेकांची अस्वस्थता वाढविणारा आहे. विलगीकरणातील व्यक्तींच्या एकांतवासाची ही अस्वस्थता प्रखर या दहावीच्या विद्यार्थ्याला अस्वस्थ करून गेली. सावंगी मेघे येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रूग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संदीप श्रीवास्तव यांचा मुलगा प्रखर याने कुटुंबात चाललेली विलगीकरणावरील चर्चा ऐकली आणि याबाबत आपण काय करू शकतो, यावर विचार करणे सुरू केले. यातूनच एकांतवास वाट्याला आलेल्यांसाठी विरंगुळ्याचे साधन म्हणून संकेतस्थळ तयार करण्याचे त्याने ठरवले. यासंदर्भात त्याने वडील डॉ. संदीप श्रीवास्तव यांच्याशी चर्चा केली आणि त्यातून www.relaxinquarantine.com हे संकेतस्थळ जन्माला आले.


या संकेतस्थळाच्या पहिल्या पृष्ठावर स्वतंत्रपणे राहण्याचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. दैनंदिन बातम्या, विभिन्न घडामोडी येथे उपलब्ध आहेत. चित्रपट, संगीत, विनोदी खेळ यासोबतच समुपदेशन आणि ध्यानधारणा करण्याचे तंत्रही येथे उपलब्ध आहे. वृद्ध व एकट्याने राहणाऱ्यांसाठी काळजीपूर्वक कसे वागावे, याचेही मार्गदर्शन उपलब्ध आहे.


विशेष म्हणजे न्यूज ट्रॅकर असल्याने व्यक्ती वेगवेगळ्या माहितींची खातरजमा स्वत:च करू शकतात. सामाजिक अंतर अनुभवत असणारे व्यक्ती या संकेतस्थळाच्या माध्यमातून अनेकांशी संवाद साधू शकतात. अनेक समूह या स्थळावर दोनच दिवसात निर्माण झाले आहेत. अत्यंत कमी कालावधीत भारतासह विविध देशांतील असंख्य लोकांनी या संकेतस्थळाला भेट दिली आहे. लोकांचा वाढता प्रतिसाद पाहून त्यात नव्याने काही भर टाकण्याचा विचार करीत असल्याचे प्रखर याने सांगितले.