नागपूर. अतुल पेठकर काेरोनापासून संपूर्ण सुरक्षा करणारी आणि मास्कवर लावता येणारी मास्क शील्ड पुणे येथील युवा उद्योजक आदित्य काबरा व त्याच्या १२ उद्योजक मित्रांनी तयार केली आहे. पुण्यात आदित्यची झीरोप्लास्ट लॅब ही कंपनी आहे. लाॅकडाऊनमुळे आदित्यसारख्याच त्याच्या मित्रांच्याही कंपन्या बंद आहेत. आदित्यसह त्याच्या मित्रांनी एकत्र येऊन या काळात कोरोनाविरुद्ध लढा देणाऱ्यांसाठी आपण काय करू शकतो, याचा विचार केला. त्याच वेळी आम्हाला फेस मास्क शील्डची कल्पना सुचल्याचे आदित्यने सांगितले.
राज्यात पीपीईची मोठी कमतरता असल्याचे बातम्यांमधून समजले. यामुळे मास्कची निर्मिती करायचे ठरवले. पीपीई किटची निर्मिती करणारी कंपनी मुंबईत फेस मास्क तयार करत असल्याचे समजले. कोरोना योद्ध्यांसाठी प्रत्येकाला फेसमास्क तयार करता यावा या उद्देशाने कंपनीने त्यांचे डिझाइन विनामूल्य उपलब्ध करून दिले. या ग्रुपने प्रोटोशॉप टिंचरिंग लॅबशी संपर्क साधून फेस मास्कचे काही नमुने बनवण्याची परवानगी मागितली. त्याच वेळी पुणे पोलिसांनी त्यांच्याकडे ६ हजार फेस शील्डची मागणी नोंदवली होती. आम्ही तयार केलेले डिझाइन सर्वांनाच खूप आवडले. आमचे डिझाइन पुनर्वापर करता येते, ते लवचिक व किफायतशीरही असल्याचे आदित्य म्हणाला.
दहा हजार फेस मास्क शील्डचे विनामूल्य केले वाटप
उत्पादन सुरू केल्यापासून नांदेड येथे सुमारे ६०० फेस मास्क दान केले. पुणे पोलिस, डाॅक्टर्स तसेच कोरोनाविरुद्ध लढणाऱ्यांना १० हजार फेसमास्क शील्ड विनामूल्य दिल्या. कोरोनाची तीव्रता पाहता येत्या १५ दिवसांत ८० हजार फेस मास्क शील्डची मागणी आहे. ही फेसमास्क शील्ड २५ रुपयांत मिळते. एमडीएफ, पारदर्शक प्लास्टिक शीट्स आणि एका लवचिक बँडपासून बनवली गेली आहे. दानदात्यांकडून मिळणाऱ्या देणगीतून उत्पादन सुरू आहे. सरकारची अंगीकृत कंपनी असलेल्या व्हेंचर सेंटर आॅर्गनायझेशनसोबत मिळून उत्पादन सुरू असल्याचे आदित्यने सांगितले.